भगिनी समाज शाळेत अग्निशमन सेवा सप्ताहाची सांगता; विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन

पालघर : पालघर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागातर्फे १४ ते २० एप्रिल २०२६ दरम्यान ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमांतर्गत भगिनी समाज संस्था संचालित प्राथमिक विद्यामंदिर, भगिनी समाज शाळेत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.“सुरक्षित शाळा, सुरक्षित रुग्णालय, अग्नि सुरक्षा जागरूक समाज – आग प्रतिबंधासाठी एकत्र” या घोषवाक्याखाली विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षेबाबत माहिती देण्यात आली.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीचे विविध प्रकार व त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या पद्धती समजावून सांगितल्या. अ, ब, क, ड, ई आणि एफ/के वर्गातील आगींचे स्वरूप व त्यासाठी वापरण्यात येणारी साधने याची सविस्तर माहिती देण्यात आली.

लिडिंग फायरमन रुचित दवणे यांनी विद्यार्थ्यांना आगी विझवण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दल कशा पद्धतीने कार्य करते, कोणती उपकरणे वापरली जातात याचेही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

या कार्यक्रमास यंत्रचालक नितीन खेताळे, फायरमन प्रतीक पाटील, मुकेश पाटील, हार्दिक पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिती वर्तक व शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अग्निसुरक्षेबाबत जागरूकता वाढवल्याचे दिसून आले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button