पालघर : राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा आणि त्यांच्या रोजगारक्षमतेत भरीव वाढ व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून प्रभावीपणे सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असून, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या दिशेने ठोस संधी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत आस्थापनांमध्ये कार्य प्रशिक्षणासाठी रुजू होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना आकर्षक विद्यावेतन देण्यात येणार आहे. १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना दरमहा ६ हजार रुपये, आयटीआय व पदविकाधारकांना ८ हजार रुपये, तर पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांना १० हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन सलग ११ महिन्यांपर्यंत मिळणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त रविंद्र सुरवसे यांनी दिली.
पालघर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी या योजनेअंतर्गत शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील विविध आस्थापनांमध्ये कार्य प्रशिक्षणाच्या संधी विभागाच्या अधिकृत वेबपोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी महाराष्ट्रात अधिवास असणे, वय किमान १८ व कमाल ३५ वर्षे, तसेच किमान शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण (आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर) असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या शिक्षण सुरू असलेले उमेदवार तसेच NAPS व MAPS अंतर्गत सहभागी उमेदवार या योजनेस पात्र ठरणार नाहीत. आधार संलग्न बँक खाते असणे अनिवार्य आहे.
इच्छुक उमेदवारांनी https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून आपली प्रोफाईल अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानंतर पालघर जिल्ह्यातील ज्या शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, बँका, पतसंस्था व शैक्षणिक संस्थांनी प्रशिक्षणार्थींसाठी रिक्तपदांची मागणी नोंदवली आहे, त्या पदांसाठी उमेदवार थेट अर्ज करू शकतात.
दरम्यान, जिल्ह्यातील अधिकाधिक खाजगी तसेच २० पेक्षा जास्त मंजूर पदे असलेल्या शासकीय आस्थापनांनी शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थींसाठीची रिक्त पदे पोर्टलवर अधिसूचित करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. यासंदर्भात काही अडचण असल्यास कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता विभाग कार्यालय, पालघर येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५२५-२९९८१२ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे
