पालघर :
राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पेल्हार पोलीस ठाण्याने केलेल्या कारवाईत गुटखा विक्रीच्या उद्देशाने मोठा साठा बाळगणाऱ्या एका दुकानदारास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळच्या सुमारास करण्यात आली.

पेल्हार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश वाघचौरे, पोलीस हवालदार रवि वानखेडे व पोलीस अंमलदार एकनाथ सारुक्ते हे पोलीस पथकासह हद्दीत गस्त घालत असताना, खान चौक, नालासोपारा स्टेशन रोड, नालासोपारा पूर्व येथील एका दुकानात शासनाने बंदी घातलेला गुटखा विक्रीसाठी आणल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ छापा टाकून दुकानचालक जावेद अहमद झहीर व अहमद अन्सारी (वय ३८ वर्षे, रा. अन्नपूर्णा शाळेजवळ, तांडापाडा, संतोषभवन, नालासोपारा पूर्व) यास ताब्यात घेतले. दुकानाची झडती घेतली असता ६ लाख ३९ हजार ४९३ रुपये किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य गुटखा विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे आढळून आले.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ७४४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील कलम २६ (२)(आय), २६ (३) व २६ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रमेश वाघचौरे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त सुहास बावचे (परिमंडळ-३, विरार) व सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (विरार विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) शकील शेख यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरित्या पार पाडली.
पेल्हार पोलीस ठाण्याच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा बेकायदेशीर व्यवसायाविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
