पालघर | प्रतिनिधी
कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या उपक्रमाला परवानगी देण्यासाठी लाच मागणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यावर अखेर कारवाई झाली आहे. पालघर तालुक्यातील नवापूर ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक राजेश पंढरीनाथ संखे याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.

नवापूर गावात सुरू होणाऱ्या कृषी पर्यटन केंद्रासाठी ग्रामपंचायतीकडून ना-हरकत दाखल्याची आवश्यकता होती. या केंद्रात तरंग तलाव, पर्यटकांसाठी खोल्या, उपहारगृह व न्याहारी गृह सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, संबंधित अर्ज जाणूनबुजून प्रलंबित ठेवत ग्रामसेवकाने परवानगी देण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला.
या प्रकरणी तक्रारदाराने पालघर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. मंगळवारी करण्यात आलेल्या पडताळणीत तक्रारीतील आरोप सत्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे, पोलीस निरीक्षक राकेश डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास भोये, आकाश लोहारे व जितेंद्र गवळे यांच्या पथकाने सापळा रचला.
पंचासमक्ष तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच ग्रामसेवक संखे याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. या कारवाईनंतर सातपाटी पोलीस ठाण्यात संध्याकाळी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या घटनेमुळे सरकारी कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला आहे. प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधातील ही कारवाई नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करणारी ठरली आहे.
