कोणत्याही स्पर्धेमधील सहभाग महत्वाचा

पालघर : प्रतिनिधी
स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणींना सामना करण्याची क्षमता निर्माण होते. आलेल्या प्रसंगाला धिराने सामोरे जाण्याची धारिष्ट्य निर्माण होते. आयुष्यात स्पर्धांना न घाबरता सामोरे गेले पाहिजे. जिंकणे किंवा हरणे यापेक्षा स्पर्धांमध्ये सहभाग घेणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखर यांनी दिला. दांडेकर महाविद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या उडान फेस्टच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयातर्फे २९ नोव्हेंबर रोजी ‘उडान’ या राज्यस्तरीय आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन केले होते. फेस्टमध्ये इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या उडान महोत्सवासाठी ८० पेक्षा अधिक शाळा-महाविद्यालयातून ७०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी सहभागी झाले होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्यासाठी असे उडान फेस्टचे आयोजन दरवर्षी केले जाते, असे सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सीए सचिन कोरे यांनी सांगितले.
सदर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किरण सावे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून आपल्या क्षमता अधिक विकसित करण्याचा प्रयत्न करा असा सल्ला सहभागी विद्यार्थ्यांना दिला.
स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावीचा शालेय स्तर व इयत्ता अकरावी, बारावीच्या महाविद्यालयीन स्तरातील विद्यार्थी सहभाग झाले होते. यात दोन्ही गटासाठी वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा, पेन्सिल स्केच स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, एकल संगीत स्पर्धा, संगीत नृत्य स्पर्धा, एकपात्री अभिनय, कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी पारितोषिकाच्या स्वरूपात एक लाख ६८ हजार रुपयाची रोख पारितोषिके ठेवण्यात आली होती. विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री. सुधीर कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख, डॉ. तानाजी पोळ, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. सुरेश हसबे, डॉ. धीरज राऊत, शैला कुलकर्णी व कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते. राज्यस्तरीय युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा पिंकी पांचाल आणि प्रा. वृषाली तामोरे यांनी परिश्रम घेतले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button