पालघर जिल्ह्यात रेल्वे पार्सल सेवा बंद

‘As per order DRM’ नोटीतून जनतेच्या तोंडाला पाने!

रेल्वे प्रशासनाने तातडीने निर्णय मागे घ्यावा, अन्यथा जनतेचा रोष रुळावर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही

पालघर : मंगेश तावडे

पालघर जिल्ह्यातील हजारो व्यापारी, छोटे व्यावसायिक, शेतकरी आणि आदिवासी समाजाच्या पोटावर पाय देत रेल्वे प्रशासनाने येथील पारंपरिक व अत्यावश्यक असलेली रेल्वे पार्सल सेवा अचानक बंद केली आहे. अल्प उत्पन्नाचे कारण पुढे करत, पालघर रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालयाला भलेमोठे कुलूप ठोकून, दरवाज्यावर केवळ “As per order DRM” अशी कोरडी नोट लावण्यात आली आहे. ही नोट म्हणजे पालघरवासीयांच्या भावना, गरजा आणि रोजगारावर थेट मार करणारी प्रशासनाची बेफिकीर सही असल्याची तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. पालघर जिल्ह्याचे मुख्यालय हे पालघर असल्याने येथे ही सुविधा जिवंत ठेवणे गरजेचे असताना सर्वसामान्यांच्या तोंडाला चक्क पाने पुसली आहेत.

पालघर, बोईसर आणि डहाणू या रेल्वे स्थानकांवरून सुरू असलेली पार्सल सेवा ही केवळ वाहतूक व्यवस्था नव्हती, तर गरीब आदिवासी, मच्छीमार, फुलविक्रेते, शेतकरी आणि लघु व्यापाऱ्यांची जीवनवाहिनी होती. स्वस्त दरात आणि जलद गतीने देशभरच नव्हे तर जगातही माल पाठविण्याची सोय या सेवेमुळे उपलब्ध होती. मात्र एका आदेशाने ती सेवा बंद करताना, त्याचे परिणाम कोणावर होतील, याचा साधा विचारही रेल्वे प्रशासनाने केला नसल्याचे स्पष्ट होते.

केळवेची विड्याची पाने, केळीची पाने, विविध प्रकारची फुले, भाजीपाला, मासे, गुजरातहून येणारा मावा, दुग्धजन्य पदार्थ, चिकू यांसारखी कृषी उत्पादने तसेच कुत्री, मांजर, कोंबडी, कबुतर, बकरीसारखी जनावरे आणि मोटारसायकल्स यांची वाहतूक या पार्सल सेवेवर अवलंबून होती. आता ही सेवा बंद झाल्याने व्यापाऱ्यांना वसई किंवा वापी येथे जाऊन पार्सल पाठवावे लागणार, ज्यामुळे वेळ, पैसा आणि मेहनत तिपटीने वाढणार आहे.

‘अल्प उत्पन्न’ हे कारण देणारे रेल्वे प्रशासन हे विसरत आहे की, ही सेवा तोट्यात नसून सामाजिक दृष्ट्या अत्यंत नफ्याची होती. गरीबांचे रोजगार, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि स्थानिक बाजारपेठा जिवंत ठेवण्याचे काम ही पार्सल सेवा करत होती. मात्र महसुलाच्या आकड्यांत अडकलेल्या प्रशासनाला माणसांचे जीवनमूल्य दिसेनासे झाले आहे.

या निर्णयाविरोधात खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “अल्प उत्पन्नाचे कारण दाखवून रेल्वेची पार्सल सेवा बंद केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. रेल्वेच्या मुख्य कार्यालयाशी प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. पालघरच्या जनतेची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही.”

आज ‘As per order DRM’ ही नोट फक्त दरवाज्यावर नाही, तर पालघरच्या कष्टकरी जनतेच्या आशांवर चिकटवलेली आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा जनतेचा रोष रुळावर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button