बुलेट ट्रेनसह रेल्वे प्रकल्पांच्या भूसंपादनाला गती देण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक

पालघर : पालघर जिल्ह्यातील विविध महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. बुलेट ट्रेन, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (DFCC), विरार–डहाणू रेल्वे चौपदरीकरण, बोरीवली–विरार पाचवी व सहावी मार्गिका (MUTP-3A) तसेच विविध रेल्वे उड्डाणपूल (ROB) प्रकल्पांशी संबंधित भूसंपादन, अनुदान वितरण आणि उर्वरित अडचणींवर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान प्रकल्पांशी संबंधित प्रशासकीय व तांत्रिक अडथळे तातडीने दूर करून भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी दिले. “विकास प्रकल्पांमध्ये कोणताही विलंब होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि वेळेत काम करावे,” असे त्यांनी सांगितले.

या बैठकीस उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) महेश सागर, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) तेजस चव्हाण, अपर निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र राजपूत, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख नरेंद्र पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, डीएफसीसीचे श्री. रॉय व श्री. देशपांडे, एमआरव्हीसीचे अरुण कुमार व दीक्षित तसेच मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्पनिहाय भूसंपादनाची सद्यस्थिती

मुंबई–अहमदाबाद अतिवेगवान रेल्वे (बुलेट ट्रेन – NHSRCL) :

या प्रकल्पासाठी डहाणू व वसई विभागातील भूसंपादन पूर्ण झाले असून, अनुदान वितरण अंतिम टप्प्यात आहे.

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (DFCC) :

भूसंपादन मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाले असून संबंधित जमीनधारकांना अनुदानाचे वितरण वेगाने सुरू आहे.

विरार–डहाणू रेल्वे चौपदरीकरण (MRVC) :

पालघर, वसई आणि डहाणू विभागांत अत्यल्प क्षेत्र शिल्लक असून बहुतांश अनुदान वाटप पूर्ण झाले आहे.

बोरीवली–विरार पाचवी व सहावी मार्गिका (MUTP-3A) :

वसई विभागातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून अनुदानाचा काही भाग वाटपासाठी प्रलंबित आहे.

रेल्वे उड्डाणपूल (ROB) – सार्वजनिक बांधकाम विभाग :

डहाणू व सुर्या येथील प्रकल्पांसाठी भूसंपादन पूर्ण झाले असून अनुदान वितरणाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

बैठकीअंती जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सर्व संबंधित यंत्रणांना नियमित आढावा घेऊन समन्वय राखण्याच्या सूचना दिल्या. या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्यातील दळणवळण अधिक गतिमान होणार असून औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button