भिकल्या लाडका धिंडा यांना पद्म पुरस्कार
भिकल्या लाडका धिंडा यांना मिळणारा पद्म पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, तो संपूर्ण जव्हारच्या आदिवासी संस्कृतीचा, तारपा या लोकवाद्याचा आणि पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या लोककलेचा राष्ट्रीय सन्मान आहे. जव्हारच्या मातीशी, जंगलाशी आणि आदिवासी जीवनशैलीशी नाळ घट्ट जोडून ठेवणारे भिकल्या धिंडा हे वयाची ८० वर्षे पूर्ण केलेले असले, तरी त्यांच्या अंगी असलेला उत्साह, चिकाटी आणि कलेवरील निष्ठा आजही तरुणांनाही लाजवणारी आहे. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने “जव्हारच्या मातीतील ८० वर्षांचे तरुण” आहेत.
तारपा वादन ही केवळ एक कला नसून ती आदिवासी समाजाची ओळख, भावना आणि जीवनशैली व्यक्त करणारी परंपरा आहे. आनंद, दुःख, सण-उत्सव, निसर्गाशी असलेले नाते—हे सारे काही तारपाच्या सुरांतून व्यक्त होते. ही परंपरा जपण्याचे, तिला जिवंत ठेवण्याचे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे काम भिकल्या लाडका धिंडा यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर निःस्वार्थपणे केले आहे. त्यांनी तारपाला केवळ वाद्य म्हणून नाही, तर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग मानले.
डोंगरदऱ्या, जंगलातील वाटा, गाव-पाड्यांमधील कार्यक्रम, आदिवासी सण-उत्सव अशा सर्व ठिकाणी त्यांच्या तारपाचे सूर झंकारले. मोठ्या मंचांची, प्रसिद्धीची किंवा मान-सन्मानाची अपेक्षा न ठेवता त्यांनी आपली कला प्रामाणिकपणे जपली. मात्र खरी कला कधीच दुर्लक्षित राहत नाही, हे त्यांच्या आयुष्याने सिद्ध केले. त्यांच्या वादनाची दखल राज्य आणि देशपातळीवर घेतली गेली. यापूर्वी दिल्लीतही त्यांचा सन्मान झाला असून, तो जव्हार आणि संपूर्ण आदिवासी समाजासाठी अभिमानाचा क्षण ठरला होता.
आज पद्म पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यभराच्या साधनेला, कलेवरील निष्ठेला आणि सांस्कृतिक परंपरेच्या जतनाला योग्य तो सन्मान मिळत आहे. हा पुरस्कार भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. यामुळे तारपा वादनास नवी ओळख मिळेल, तसेच आदिवासी लोककलेचे महत्त्व नव्याने अधोरेखित होईल.
भिकल्या लाडका धिंडा हे केवळ उत्कृष्ट तारपा वादक नाहीत, तर ते आदिवासी संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहेत. त्यांच्या या ऐतिहासिक गौरवामुळे जव्हारच्या मातीचा सुगंध देशभर पसरला आहे. त्यांच्या कलेला सलाम करत, त्यांना या पद्म पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि दीर्घायुष्य व आरोग्यासाठी शुभेच्छा.
– मंगेश तावडे, पालघर (7721994798)
