पालघर : मंगेश तावडे
पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती २०२४-२५ अंतर्गत पोलीस शिपाई पदाच्या १५८ रिक्त जागा तसेच ७ चालक पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी एकूण ९१०९ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यामध्ये ७७६३ पुरुष व १४४६ महिला उमेदवारांचा समावेश आहे. गैरप्रकारांना आळा घालण्यात आला असून उमेदवारांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रथम मैदानी चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा
ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार असून, त्यामध्ये प्रथम मैदानी चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मैदानी चाचणी दि. ११ फेब्रुवारी २०२६ ते दि. २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पालघर येथील कोळगाव पोलीस मुख्यालयाच्या पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित करण्यात आली आहे.
भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी पालघर रेल्वे स्टेशन तसेच बस स्थानक येथे पोलीस भरती हेल्प डेस्क (मदत कक्ष) उभारण्यात आले असून, मार्गदर्शनासाठी सूचना फलकही लावण्यात आले आहेत. तसेच लांबून येणाऱ्या उमेदवारांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला उमेदवारांसाठी आंबामाता मंदिर, पाचबत्ती नाका, पालघर येथे तर पुरुष उमेदवारांसाठी उमरोळी ग्रामपंचायत हॉल, उमरोळी तसेच पद्मनाभ स्वामी मंदिर, टेंभोडे येथे राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, मैदानी चाचणीदरम्यान कोणत्याही प्रकारचे डिजिटल स्मार्ट वॉच, मोबाईल फोन अथवा अन्य तांत्रिक साहित्य वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच स्पाईक शूज वापरण्यास बंदी असून, डमी उमेदवार, उत्तेजक द्रव्यांचा वापर किंवा अन्य कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
सदर पोलीस भरती प्रक्रिया पूर्णतः निपक्षपाती व पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याचे पालघर जिल्हा पोलीस दलाने स्पष्ट केले आहे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, आमिष किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष, पालघर अथवा पोलीस हेल्पलाईन आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस नियंत्रण कक्ष, पालघर : ०२५२५-२०५३०० / २०५३१४,
पोलीस हेल्पलाईन : ८६६९६०४००४ / ८६६९६०४०७०,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : ०२५२५-२९७२९७
पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व उमेदवारांना शिस्त, प्रामाणिकपणा व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
_ यतीश देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक, पालघर
