महिलांच्या हाती स्वयंरोजगाराची चावी; नावझे येथे महिलांचे सक्षमीकरण

पालघर : ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ग्रामपंचायत नावझे येथे तीन दिवसांचा “लर्निंग लिंक व्यवसाय प्रशिक्षण” कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत, माविम स्थापित संपदा लोकसंचालित साधन केंद्र, पालघर आणि सक्षम महिला उद्योजकता कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमात गावातील महिला बचत गटांच्या एकूण ७२ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिलांना केवळ व्यवसायाचे प्राथमिक ज्ञान देणे इतकाच उद्देश न ठेवता, स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास, योग्य दिशा आणि उपलब्ध संधींची माहिती देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवून कुटुंबाच्या तसेच समाजाच्या आर्थिक प्रगतीत त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे, हे या प्रशिक्षणामागील प्रमुख उद्दिष्ट ठरले.

प्रशिक्षणादरम्यान महिलांना विविध लघुउद्योग, उत्पन्नवाढीच्या संधी, बचत व गुंतवणूक, बाजारपेठेची माहिती तसेच शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याचबरोबर सर्व लाभार्थी महिलांचे उद्योग आधार कार्ड मोफत तयार करून देण्यात आले. त्यामुळे महिलांना भविष्यात शासकीय योजना, कर्जसुविधा आणि विविध आर्थिक सवलती सहजपणे मिळण्याचा मार्ग खुला झाला.

या कार्यक्रमामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत होते. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाकडे टाकलेले हे ठोस पाऊल असून, महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामपंचायत, महिला बचत गट आणि उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button