वाड्यातील अवैध फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २० वर्षीय कामगाराचा मृत्यू, महिलांसह अनेक जखमी

वाडा : रुपेश मोकाशी

तालुक्यातील कोनसई गावाच्या हद्दीत अवैधरित्या सुरू असलेल्या फटाका कारखान्यात मंगळवारी दुपारी भीषण स्फोट होऊन २० वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेने परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.कोनसई येथील वसंत नाईक यांच्या मालकीच्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये नरेंदर सिंग व यादव यांनी काही महिन्यांपूर्वी सुतळी बॉम्ब तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता. या ठिकाणी भावेश वावर (वय २०, रा. वावरेपाडा, जामघर) याच्यासह सुमारे २५ ते ३० महिला रोजंदारीवर काम करत होत्या.

मंगळवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास भावेश वावर हा सुतळी बॉम्बसाठी लागणाऱ्या दारूचे मिश्रण तयार करत असताना अचानक प्रचंड स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की, भावेश याचे शरीर छिन्नविछिन्न होऊन अवयव ८० ते १०० मीटर अंतरावर फेकले गेले. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

या स्फोटात मोनिका पडवळे (वय ३०, रा. पालसई) गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मोनिका जाधव, जागृती गवते, प्रतिभा पवार, अर्चना मिसाळ आणि जयश्री गरळ या महिला जखमी असून त्यांच्यावर वाड्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे हे सर्व कामगार स्थानिक आहेत.

घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह नेणाऱ्या शववाहिकेला अडवून कारखान्याचा मालक येईपर्यंत मृतदेह न सोडण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. दरम्यान, या कारखान्यास कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे समोर आले असून तो मागील सहा महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाला याची कोणतीही कल्पना नव्हती, ही बाब गंभीर आणि आश्चर्यकारक असल्याची मानली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी संदीप चव्हाण, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहर आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button