दांडेकर महाविद्यालयात चित्रपट दिग्दर्शन कार्यशाळा

श्वास’ आणि ‘नदी वाहते’ चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांनी विद्यार्थ्यांना केले २ दिवस मार्गदर्शन

पालघर : 

चित्रपट क्षेत्रातील विविध संधीचा परिचय, पटकथा लेखन, संवाद लेखन आणि चित्रपट दिग्दर्शन याची विद्यार्थ्यांना मूलभूत माहिती व्हावी याकरिता सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या दृष्टी मूव्ही क्लब, मराठी आणि इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानेकोकण १० आणि ११ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपट पटकथा लेखन आणि दिग्दर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सुवर्ण कमळ पारितोषिक प्राप्त ‘श्वास’ चित्रपटाचे तसेच ‘नदी वाहते’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांनी विद्यार्थ्यांना २ दिवस मार्गदर्शन केले. 

कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला करीयर करायचे असेल तर त्याची न भिता सुरुवात करावी लागेल, त्यात सातत्य राखावे लागेल असे प्रतिपादन संदीप सावंत यांनी केले. पटकथा लिहिताना कथेचा फोकस बदलता कामा नये. आपल्याला आपली कथा दृश्यात रुपांतर होणार आहे याचा विचार सातत्याने करावा. कथेत पात्र आणि त्याची कृती अथवा वर्तन असले पाहिजे, नाटकाचे माध्यम शब्द तर चित्रपटाचे माध्यम चित्र आहे, अभिनय करताना नटाला शरीर नसते, अशा अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. अभिनय, भाषा, कथालेखनावर विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली. आत्मविश्वासाने उभे राहून कसे बोलावे हे त्यांनी शिकवले.अभिनय क्षेत्रात जर काम करायचे असेल तर नाटकापासूनच सुरुवात करावी लागते. असे त्यांनी सांगितले. सहभागी विद्यार्थ्यांना कार्यशाळा उपयुक्त ठरली.

कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. किरण सावे यांच्या हस्ते संपन्न झाले. उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख यांनी आपल्या मनोगतात मानवी जीवनातील सिनेमाचे महत्त्व सांगितले तर प्राचार्य सावे यांनी अशा त-हेच्या कार्याशाळांना प्रतिसाद द्यावा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. महाविद्यालयातील विविध शाखांतील पन्नास विद्यार्थी कार्यशाळेस उपस्थित होते. प्रा. यादव मोरे. डॉ. दर्शना चौधरी, दृष्टी मूव्ही क्लब प्रमुख प्रा. मधुरा राऊत, साक्षी घरत, मराठी विभाग प्रमुख प्रा. विवेक कुडू यांनी कार्यशाळेच्या आयोजनात विशेष मेहनत घेतली.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button